नवेगावबांध : पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा (जिल्हा वार्षिक योजना) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या इटियाडोह रस्ता बांधकाम प्रकल्पात गंभीर अनियमितता समोर आली आहे. कागदोपत्री मंजुरी एका महसूल गटासाठी असताना प्रत्यक्ष रस्ता बांधकाम थेट वनविभागाच्या राखीव जंगल क्षेत्रात सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
१७ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यारंभआदेशानुसार, पर्यटन स्थळ इटियाडोह (गोठणगाव) येथे डॅमकडे जाणारा रस्ता बांधकाम करणे या कामास मंजुरी देण्यात आली आहे. हे काम पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा अंतर्गत योजना क्रमांक ३४५२२८५६/३१ अंतर्गत मंजूर असून कार्यारंभ आदेशात कामाचे ठिकाण स्पष्टपणे गोठणगाव महसूल गट क्रमांक २८१ असे नमूद केले आहे.
मात्र, प्रत्यक्ष पाहणीत हा रस्ता गट क्रमांक २८१ वर न करता वनविभागाच्या बोरटेकडी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या रिजर्व्ह फॉरेस्ट
क्षेत्रातील कम्पार्टमेंट क्रमांक २०१ मध्ये सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मंजूरी गैर वन जमिनीसाठी व प्रत्यक्ष काम मात्र आरक्षित वनजमिनीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण रस्ता राखीव जंगल क्षेत्रातून जात असतानाही वनसंवर्धन अधिनियम १९८० नुसार आवश्यक असलेली केंद्र शासनाची मंजुरी, वनविभागाची अधिकृत परवानगी, जमीन विभाजन आदेश अस्तित्वात असल्याचा कोणताही उल्लेख कार्यारंभआदेशात अथवा उपलब्ध शासकीय नोंदींमध्ये नाही. यामुळे वनविभागाच्या अखत्यारीतील जमिनीवर रस्ता बांधकाम करण्यास जिल्हा परिषदेने कोणत्या अधिकारात व कोणत्या मंजुरीच्या आधारे परवानगी दिली हा गंभीर प्रशासकीय प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मौका चौकशी करून कारवाईची मागणी
तक्रारीनुसार गट क्रमांक २८१ वर मंजुरी दाखवून प्रत्यक्षात वनजमिनीवर काम करणे, कार्यारंभ आदेशाच्या अटींचे उल्लंघन, वनसंवर्धन कायद्याचा संभाव्य भंग व चुकीच्या ठिकाणी केलेल्या कामाचे बिल काढण्याची तयारी, या बाबी थेट शासकीय निधीच्या गैरवापराकडे निर्देशित करतात. याप्रकरणी तत्काळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर कामाची देयके थांबवावीत तसेच दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे





