23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ वयोवृध्द व नवोदीत मतदारांच्या साक्षीने राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

वयोवृध्द व नवोदीत मतदारांच्या साक्षीने राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

0
38

गोंदिया, दि.24 : वयोवृद्ध व नवोदित मतदाराच्या साक्षीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. 25 जानेवारी 1950 ला भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदानाची शपथ घेऊन राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करुन घेणे हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो. यावर्षी मतदार दिनाची संकल्पना “माझे देश, माझे मत” असे आहे.

भारत निवडणूक आयोगाचे 21 जानेवारी 2026 चे पत्रान्वये 25 जानेवारी हा कामकाजाचा दिवस नसल्यामुळे 23 जानेवारी रोजी मतदान शपथ घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

याप्रसंगी 84 वर्षीय मतदार मुन्नालाल यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी व 18 वर्षावरील विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थितांना व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच विधानसभा मतदार संघातील संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांनी निवडणुकीचे उत्कृष्ट काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आले. उपस्थितांचे आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी मानले.

blank