गडचिरोली -जिल्ह्यातील माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी उपविभाग भामरागड अंतर्गत बिनागुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.
अवघ्या २४ तासांत सुमारे १०५० मनुष्यबळ, सी-६० कमांडो, बीडीडीएस पथके, विशेष पोलीस अधिकारी व यंत्रसामग्रीच्या मदतीने हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले.
या केंद्राचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट शंभु कुमार यांच्या उपस्थितीत पार पडले.
या पोलीस मदत केंद्रामुळे अतिदुर्गम भागात जलद सुरक्षा, प्रशासनाचा थेट संपर्क, विकासकामांना गती मिळणार असून सन 2023 पासून सुरक्षा पोकळी कमी करण्याच्या साखळीतील हे १० वे पोलीस मदत केंद्र ठरले आहे.
उद्घाटनप्रसंगी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करून स्थानिक नागरिकांना विविध जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात राष्ट्रीय महामार्ग, मोबाईल टॉवर, एस.टी. बस सेवा यांसारख्या विकासकामांना चालना मिळणार आहे.





