29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

0
31

अर्जुनी/मोर.-तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ अर्जुनी/मोर यांच्या संयुक्त वतीने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन सादर करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अर्जुनी-मोर. येथील तहशिल कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम भुमिपुजनाचे वेळी हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात गोंदिया जिल्हा हा धानाचा प्रमुख जिल्हा असून मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अल्प उत्पादनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून यावर्षी धानाला तातडीने बोनस जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. धानाला बोनस जाहीर झाल्यास अर्जुनी/मोर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच सध्या सुरू असलेल्या कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अल्प उत्पादनामुळे अनेक शेतकरी कर्ज भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे 31 मार्च किंवा 30 जूनपर्यंत कर्ज भरण्याची अट शिथिल करावी अथवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा अनेक शेतकरी कर्ज न भरण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय आधारभूत धान खरेदीचे प्रलंबित पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष ललित बाळबुध्दे तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघाचे अध्यक्ष ललितकुमार बाळबुध्दे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.