नागपूर, दि. 27 जानेवारी: भारतीय प्रजासत्ताक दिनापुर्वी महावितरणच्या नागपूर परिमंडलाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या दीक्षाभूमी आणि खामला या दोन अत्यंत महत्त्वाच्या 33/11 केव्ही उपकेंद्रांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी जागतिक स्तरावरील मानाचे ‘आयएसओ 9001:2015’ हे गुणवत्ता मानांकन बहाल करण्यात आले आहे. या यशामुळे महावितरणच्या सेवा गुणवत्तेवर जागतिक मान्यतेची मोहोर उमटली आहे.
अखंडित वीज पुरवठा आणि तांत्रिक सक्षमीकरण दीक्षाभूमी आणि खामला ही उपकेंद्रे नागपूर शहरातील सामाजिक, ऐतिहासिक आणि व्यावसायिक दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागांना वीज पुरवठा करतात. यामध्ये दीक्षाभूमी परिसर, बजाज नगर, श्रद्धानंद पेठ, आठ रस्ता, सेंट्रल बाजार रोड, वसंत नगर, जयप्रकाश नगर, मालवीय नगर, टेलीकॉम नगर, खामला, इंद्रप्रस्थ नगर, कलश अपार्टमेंट आणि दीनदयाळ नगर यांसारख्या उच्चभ्रू व गजबजलेल्या वस्त्यांचा समावेश आहे. महावितरणच्या ‘इज ऑफ लिविंग’ (सुसह्य जीवन) या संकल्पनेनुसार, या भागातील ग्राहकांना तांत्रिक बिघाडमुक्त आणि उच्च दाबाचा अखंडित वीज पुरवठा मिळावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून येथे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
मानक ठरलेली कार्यप्रणाली हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी उपकेंद्रांच्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. ज्यात प्रामुख्याने उपकेंद्रातील सर्व यंत्रसामग्री आणि सुरक्षा प्रणालींची कडक चाचणी घेऊन त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. ट्रान्सफॉर्मर (रोहित्र), उच्च दाब व लघुदाब वीज वाहिन्यांची नियमित देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक कार्यपद्धती अवलंबली गेली आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण आणि पारदर्शक कामकाजावर विशेष भर देण्यात आला. उपकेंद्र परिसराचे सुशोभीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जागतिक मानकांचे पालन करण्यात आले.
कर्मचाऱ्यांची एकजूट आणि ‘टीम वर्क’चे यश विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हे यश केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे नव्हे, तर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून घेतलेल्या पुढाकारामुळे मिळाले आहे. कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कामकाजात शिस्तबद्धता आणली आणि सेवा सुधारण्यासाठी अतिरिक्त श्रम घेतले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला.
या महत्त्वपूर्ण कामगिरीत अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे, प्रशांत काकडे, रमेश नागदेवते, सहायक अभियंता अभिलाष बारापात्रे, प्रशांत शेंडे आणि राहुल चिंतलवार या अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच, प्रत्यक्ष मैदानावर काम करणारे यंत्रचालक सुशांत शृंगारे, मंगला भांगे, मुकेश वानखेडे, रवींद्र दुरतकर, उमेश गावंडे, परशुराम दिघोरे, परीक्षित भालेराव आणि काँग्रेस नगर विभागातील दुरुस्ती पथकाने अहोरात्र परिश्रम घेऊन हे मानांकन खेचून आणले आहे.
या यशाबद्दल महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाने संपूर्ण चमूचे कौतुक केले असून, या यशामुळे नागपूरमधील वीज ग्राहकांचा महावितरणवरील विश्वास अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास महावितरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.





