खळबंदा जलाशय कालवा प्रकरण
गोंदिया : मागील वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने अतोनात नुकसान केले. जिल्ह्यात या पावसाचा फटका पडला. अनेक भागात शेतकर्यांना नुकसानीला समोर जावे लागले. त्यातच मागील वर्षी २६ सप्टेंबर २०२५ रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खळबंदा जलाशयाच्या कालवा, जो सेजगाव, परसवाडा, अर्जुनीला जातो. तो फुटला. मात्र या बाबीला आज ६ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र संबंधित पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने यंदाचा रब्बी हंगाम तर गेलाच, त्यातच त्याची झळ आता पुढे येणार्या खरीप हंगामालाही बसण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत पाटबंधारे विभाग शेतकर्यांच्या जीवावर उठला की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
सविस्तर असे की, खळबंदा जलाशयातून जवळपास ५० ते ६० गावांना सिंचनाची सोय खरीप व रब्बी हंगामात होते. खळबंदा जलाशयाच्या माध्यमातून सेजगाव, अर्जुनी, परसवाडा, सोनेगाव, नहरटोला, बोरा, बघोली तसेच परिसरातील ५० ते ६० गावांना पाणी जातो, तो कालवा सेजगाव ते खळबंदाच्या मधातून २६ सप्टेंबर २०२५ रोजी फुटला. हा कालवा फुटल्याने खरीप हंगामात शेतकर्यांचे नुकसान झाले. या बाबीला आज ६ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र या काळात कालवा दुरुस्तीसाठी कोणतीही उपाययोजना झाली नसल्याने खरीप हंगामातील धान पीक गेले मात्र यंदाच्या रब्बी हंगामापासून शेतकर्यांना मुकावे लागणार आहे. या प्रकाराला घेवून परिसरातील अनेक गावातील शेतकर्यांनी खळबंदा जलाशयाचे कार्यालय गाठून व्यथा मांडली. मात्र पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी, कर्मचार्याला अद्यापही पाझर फुटलेला नाही. एकदंरीत पाटबंधारे विभागातील अतिकर्तव्यदक्ष अधिकार्यांच्या आशिर्वादानेच खरीप हंगामातील शेतकर्यांचे हाती आलेले धान पीक निसटले. एंकदरीत यंदाचा रब्बी हंगाम सुरू झाला असून पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणाने या कालव्या अंतर्गत येणार्या गावातील शेतकरी रब्बी हंगामाला मुकले आहेत. त्यातच यंदाच्या खरीप हंगामासाठी ५ महिन्याचा अवधी शिल्लक असतांना तोपर्यंत तरी हा कालवा दुरुस्त होणार का? अशी चिंता शेतकर्यांना लागली आहे. मात्र सद्यातरी पाटबंधारे विभाग शेतकर्यांच्या जीवावरच उठल्याचे दिसून येत आहे.
आमदाराच्या आदेशाला ठेंगा
कालव्याच्या दुरुस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनीही ८ ऑक्टोबर २०२५ रोजी फुटलेल्या कालव्याला भेट देवून संबंधित विभागातील अधिकार्यांची चर्चा केली होती. तसेच त्वरित कालवा दुरुस्त करून शेतकर्यांना न्याय देण्याचे आदेश निर्गमित केले होते. मात्र त्यांच्या आदेशालाही पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी ठेंगा दाखविल्याचे चित्र कालव्या नादुुरुस्तीवरून दिसून येत आहे.
विभागातील अधिकारी बेजबाबदार
खळबंदा जलाशयाची डागडुजी व देखभाल दुरूस्ती पाटबंधारे विभाग गोंदियाच्या खांद्यावर आहे. मात्र या एकाही अधिकार्यांकडून कालव्याची दुरुस्ती करून शेतकर्यांना सिंचनाची सोय कशी उपलब्ध करता येईल, याची उपाययोजना तयार केली नसल्याने यंदाचे रब्बी हंगाम तर गेले व पुढे येणारा खरीप हंगामाही संकटात दिसून येत आहे.
हजारो हेक्टर शेत जमिनीचे नुकसान
तालुक्यातील खळबंदा जलाशयाच्या कालवा फुटला त्या कालव्याच्या माध्यमातून कारुटोला, अत्री, गोमाटोला, सेजगाव, बोदा, गोंडमोहाडी, सोनेगाव, बेरडीपार, डब्बेटोला, परसवाडा, बोरा, बघोली, किडंगीपार, अर्जुनी या गावातील शेतकर्यांना सिंचनाची सोय होते. परंतु कालवा नादुरुस्त असल्याने त्याचा फटका ५० ते ६० गावांना पडणार असून हजारो हेक्टर जमिन खरीपातही सिंचनापासून वंचित राहणार, अशी स्थिती संबंधित विभागाने निर्माण केली आहे.
कालवा त्वरित दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन
जशालयाचा कालावा फुटला याला अधिकारी व कर्मचारी कारणीभूत असल्याची,संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पाणी आकारणी कर व इतर बाबींसाठी विभागाचे कर्मचारी व अधिकारी शेतकर्यांना त्रास देतात. मात्र झालेला प्रकार हा विभागाचा नाकर्तेपणा असल्याचे उघड झाले आहे. तेव्हा हा कालवा त्वरित दुरुस्त करून शेतकर्याना न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. तसेच कालवा दुरुस्ती दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेजगावचे उपसरपंच टेकचंद बिसेन, सोनेगावचे माजी सरपंच बाळुभाऊ भगत, जितेंद्र बिसेन, महेंद्र पारधी यांच्यासह बाधित गावातील शेतकर्यांनी केली आहे.





