गोंदिया:येथील न्यू लक्ष्मी नगर परिसरात जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याने भक्ती, शक्ती आणि प्रबोधनाचा अनोखा त्रिवेणी संगम घडवून आणला, ज्यात गोंदिया शहरातील हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ह.भ.प. बळीराम दादा उके यांचे प्रबोधनपर कीर्तन ठरले. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांद्वारे उत्कृष्ट निरूपण करत उपस्थित जनसमुदायाचे प्रबोधन केले. त्यांना ॐ त्रिमूर्ती भजन मंडळाची मोलाची साथ लाभली. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष रामलाल गायधने, कोषाध्यक्ष हिरामणजी डोंगरवार, सचिव भावरावजी भस्मे, ह.भ.प. उर्मिला कारेमोरे, ह.भ.प. विठाबाई कुंभालवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत भरली.
जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित दहीकाला कार्यक्रमानंतर उपस्थित हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी जिल्ह्यातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.





