गोरेगाव,दि.०७ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकारी वासनिक यांनी गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मोहगाव बु. येथे शनिवार (दि.६) भेट देऊन कार्यालयीन दप्तर तपासणी करीत कार्यालयीन परिसरातील बगिचा,निर्मल जल प्लाँट,वाचनालयासह बचतगट भवन परिसराची पाहणी केली.
संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा देखील या अभियानात समावेश असून अभियानांतर्गत प्रगती पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी यांनी ग्रामपंचायतींच्या तपासणीच्या धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, गोरेगावचे गटविकास अधिकारी हेमराज गौतम यावेळी उपस्थित होते. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करून ग्रामपंचायतींच्या रेकॉर्डची देखील उपमुकाअ यांनी पाहणी केली.ग्रामपंचायतीच्यावतीने पाहणीकरीता आलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे संत तुकडोजी महाराजांची भगवी टोपी घालून स्वागत करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कमलेश्वर रहांगडाले,ग्रामपंचायत सदस्य डिलेश्वर गौतम,चुनीलाल पटले,शिसुकुमार कटरे,दिलीप पटले,इंद्रराज येळे व इतर ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
आपली ग्रा.पं. अधिकाधिक लोकाभिमुख करा
विशेष म्हणजे, या अभियानात ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर मिळून सुमारे सहा कोटी ६५ लाखांपर्यंतचे पुरस्कार मिळण्याची संधी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या गुणांकनाकडे लक्ष द्यावे, आपली ग्रामपंचायत अधिकाधिक लोकाभिमुख आणि समृद्ध करण्यावर भर द्यावा, असे निर्देशही उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासनिक यांनी दिले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायतींच्या सबंध विकासावर भर देते. लोकसहभागासह लोकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यावर अभियानाचे गुणांकन आहे.





