26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ चिखलदरा येथे पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

चिखलदरा येथे पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

0
19
अमरावती, दि. 10 : चिखलदरा येथे स्काय वॉक, गोलमार्ग, ग्लो गार्डन, मधाचे गाव आमझरी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. चिखलदरा परिसरात पर्यटन क्षेत्र विकासाला वाव असून याठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉकचा आढावा घेतला. स्कायवॉकची लांबी असल्याने मध्यभागी आधार द्यावा लागणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या स्कायवॉकला कायमस्वरूपी आधार द्यावा लागणार असल्यामुळे या भागातून माकड किंवा इतर प्राणी चढून जाऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. यासोबतच 27 किलोमीटरचा गोलमार्ग तयार करण्यात येणार आहे. वन क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी. तसेच ग्लो गार्डनसाठी शक्यता तपासून पहाव्यात.
चिखलदरा येथे पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. याठिकाणी ट्रेकींगचे पर्याय दिल्यास पावसाळ्यानंतर मार्चपर्यंत पर्यटक येतील. यासाठी वन विभागाने ट्रेकचे मार्ग निश्चित करावेत. पर्यटनामुळे चिखलदरामध्ये क्रांती घडू शकते. त्यामुळे येथे पर्यटकांना सुविधा द्याव्यात. पीएम मित्रा पार्कमधील महापारेषणने उपकेंद्राचे काम सुरू करावे. यासाठी आवश्यक असणारे सहकार्य करण्यात येईल. यासोबतच मेळघाटातील 22 गावांच्या विजेच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची परवानगी मिळातच इतर कामे करावीत. आमझरी मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे शबरी महामंडळाने रिसॉर्टसाठी एकत्रितरित्या कार्य केल्यास जादा पर्यटकांची सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज, संत्रा प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात यावी, अशी सूचनाही श्री. येरेकर यांनी केली.

blank