गोंदिया : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय अकरा ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशभर १२ फेब्रुवारी रोजी संप पुकारण्यात आला आहे. यात राज्य सरकारी निम्न सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास सकाळी साडेअकरा वाजता ते दीड वाजतापर्यंत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया जिल्हा समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन गोंदिया जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक लीलाधर पाथोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याची माहिती कमलेश बिसेन उपाध्यक्ष कर्मचारी महासंघ यांनी दिली. सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
या आंदोलनाच्या माहितीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम यांना देण्यात आले. शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष पी. जी. शहारे, उपाध्यक्ष कमलेश बिसेन, सरचिटणीस संतोष तोमर, सौरभ अग्रवाल, संतोष तुरकर, सुभाष खत्री, कुलदीप कापगते, यध्येश मानापुरे, भगीरथ नेवारे, तेजस्विनी चेटुले, चित्रा ठेंगरी, ओ.जे. बिसेन यांचा समावेश होता.





