35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ शहरातील सिंधी समाजाच्या 500 हून अधिक घर–दुकानांना मोफत मालकी हक्क मिळणार

शहरातील सिंधी समाजाच्या 500 हून अधिक घर–दुकानांना मोफत मालकी हक्क मिळणार

0
22

blank

विधायक विनोद अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सिंधी समाजाला मोठा दिलासा

गोंदिया, 14 फेब्रुवारी-1947 मधील फाळणीनंतर भारतात विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला गत 75 वर्षांपासून जमीनपट्ट्यांच्या मालकी हक्काची मागणी प्रलंबित होती. मतांसाठी राजकारण करणाऱ्यांनी आश्वासन तर दिले, परंतु प्रत्यक्ष हक्क मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. मात्र आता गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सिंधी समाजाची व्यथा स्वतः जाणून घेत, गेल्या काही वर्षांपासून समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून आता सिंधी समाजातील हजारो कुटुंबांना मोफत जमीनपट्ट्यांचा मालकी हक्क मिळणार आहे.

या प्रकरणात आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे मागणी करून सिंधी समाजाला पट्ट्यांचा हक्क देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार सिंधी समाजाला जमीनपट्टे देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली व संबंधित विभागाला आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. अलीकडेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या सिंधी समाजाच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करून जमीन वाटपाचा प्रश्न सोडवून मालकी हक्क देण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, हजारो सिंधी कुटुंबे जमीनपट्ट्यांच्या हक्कासाठी लढा देत होती. टँकपार्क परिसरातील 110 दुकाने तसेच एकूण 500 दुकान–घरे यांना आता मोफत मालकी हक्क मिळणार आहे, मग ते नझूल जमिनीवर किंवा कोणत्याही शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारक असो.

यासोबतच आमदार अग्रवाल यांनी असेही सांगितले की, गोंदिया शहर व ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांनाही (वनजमीन वगळून) जमीन वाटप करून मालकी हक्क देण्याचे काम सुरू आहे. यासाठीचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांनाही त्यांचा हक्क मिळणार आहे.

blank