37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू 

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू 

0
135

blank

गोंदिया : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर नैनपुर डुगीपार जवळील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास घडली.प्राथमिक माहितीनुसार नव्या उड्डाणपुलाच्या जवळून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली.
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून जातो. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट्या नैनपूर गावालगत चिंदादेवी जंगल शिवारातून नवनिर्मित उड्डाणपूलाजवळून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सडक अर्जुनी वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या प्रकल्पाला लागूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि गोंदिया-कोहमारा राज्य महामार्ग जात असून या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. मात्र, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमुळे या महामार्गावर आतापर्यंत अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, मध्यरात्रीच्या या घटनेमुळे यात पुन्हा भर पडली असून सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी मिथुन तरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

blank