26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ देसाईगंज येथील कुंभकर्णी गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाविरोधात ढोल बजाव आंदोलन

देसाईगंज येथील कुंभकर्णी गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाविरोधात ढोल बजाव आंदोलन

0
27
– करपडा चक शेतातील वाळू निष्कासन प्रकरण पेटले.
देसाईगंज, दि.२५  : करपडा चक येथील सर्वे क्रमांक १५७/१ मधील पुरामुळे साचलेल्या रेतीच्या निष्कर्षणासाठी सादर करण्यात आलेल्या चुकीच्या अहवालाचा प्रस्ताव तत्काळ रद्द करून संबंधित समिती सदस्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते सुरज हजारे यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय, देसाईगंज समोरचे बेमुदत आंदोलन आज चौदाव्या दिवशीही सुरूच राहिले. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले असून आज कुंभकर्णी, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाविरोधात ढोल बजाव आंदोलन करत निषेध करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, करपडा चक येथील रेती उपसा प्रकरणात सादर करण्यात आलेला अहवाल वस्तुस्थितीपासून दूर असून शासनाची व जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव रद्द करून चुकीचा अहवाल देणाऱ्या समिती सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असतानाही प्रशासनाने चौदा दिवसांत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
याउलट, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांची व शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. वाळू माफियांच्या संगतीने प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याची टीका करत, ‘गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठीच ढोल बजाव आंदोलन करण्यात आले,’ असे सुरज हजारे यांनी सांगितले.
दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. ‘न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,’ असा इशाराही देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतही मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत प्रशासनास थेट जबाबदार धरण्यात आले आहे.

blank