अर्जुनी मोरगाव : गावांना जोडले जाणारे रस्ते दर्जेदार बनावे. सुसज्ज मार्गामुळे गावातील सौंदर्य फुलून उठते. ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा पूर्ण झाल्या तरच गावाचा सर्वागीण विकास साधने सहज शक्य आहे. गावातील प्रत्येक माणूस हा विकासाचा मुख्य कणा आहे. ग्रामीण भागाचा विकास साधण्यावर आपला सर्वाधिक भर आहे. गुडगुडीत, दर्जेदार रस्ता निर्मितीने गावाच्या वैभवात भर पडणार असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
तालुक्यातील बोंडगावदेवी येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी प्रतिमा बोरकर, डॉ. श्यामकांत नेवारे, राधेश्याम झोडे, अॅड. श्रीकांत बनपूरकर, रत्नाकर बोरकर, धनंजय बनपूरकर, देवराव बोरकर, नानू मेश्राम, ग्रामविकास अधिकारी संतोष परमार, उमेश उईके, यशवंत बोरकर, भागवत लंगे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गावात विविध विकास कामांचा शुभारंभकरण्यात आला.यावेळी वॉर्डातील महिलांनी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असल्याची बाब जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत त्यांनी लवकरच नवीन बोअरवेल मंजूर करण्याचे आश्वासन दिले. गावात भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने दूर करणार. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढे आल्यास विकासाची गंगा गावात येण्यास विलंब लागणार नाही असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.





