स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना मिळाले विक्रीचे व्यासपीठ; ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
भंडारा, दि .10 :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांच्या वतीने “जिल्हास्तरीय वैणगंगा मिनी सरस विक्री व प्रदर्शन ” 10 ते 14 मार्च 2026 या कालावधीत दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे।
या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, 10 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता पार पडला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ फंडर (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद) यांची विशेष उपस्थिती लाभली. सोबतच माजी सभापति रमेश पारधी, श्रीमती स्वाती ताई वाघाये, जिला परिषद सदस्य श्रीमती पूजाताई हजारे, श्रीमती नंदाताई झंझाड़, श्रीमती लता ताई नरुले, श्रीमती आशा ताई डोरले प्रमुख पाहुणे उपस्थित होते.प्रसंगी प्रमोदकुमार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद व विविध विभागांचे अधिकारी उमेश नंदागवळी, संजय जोल्हे, संदीप बोरकर सह सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात भंडारा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक ग्रामीण उत्पादने तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी या प्रदर्शनामुळे एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा येथील प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे, तसेच उमेद – भंडारा जिल्हा अभियान व्यवस्थापक गौरव तुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण उत्पादनांना पसंती दिली. या उपक्रमामुळे स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.





