भंडारा , दि.10: ग्रामीण भागातील कुटुंबांना गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी नियमित, पुरेसे व शाश्वतपणे उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत देशभरात 8 ते 22 मार्च 2026 या कालावधीत ‘जल महोत्सव’ पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल महोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.
जल जीवन मिशन द्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेत सामुदायिक सहभाग आणि दीर्घकालीन शाश्वतता वाढवण्यासाठी जिल्ह्यात 22 मार्च पर्यंत “जल महोत्सव” पंधरवाडा साजरा केला जात आहे. तसेच काही निवडक गावांमध्ये “जल अर्पण दिवस” साजरा करून गाव पातळीवरील पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायत व ग्राम पाणी व स्वच्छता समितीकडे (VWSC) औपचारिक हस्तांतरण केले जाणार आहे.
गाव व पंचायत स्तरावर ग्रामसभा, ग्राम पाणी व स्वच्छता समिती तसेच विविध समुदाय संस्थांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या सेवांचा आढावा घेणे, जलस्रोतांची स्थिती तपासणे, पाणी गुणवत्तेची चाचणी करणे, संचालन व देखभाल याबाबत नागरिकांची जबाबदारी वाढविणे, तसेच महिला, स्वयं-सहायता गट, युवक आणि शाळांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल. फील्ड टेस्ट किटद्वारे च्या साहाय्याने महिलांकडून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. “बॅक टू रुट्स – माय व्हिलेज, माय वॉटर सोर्स” या उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व मान्यवर व्यक्तींना त्यांच्या मूळ गावात जाऊन स्थानिक पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेतील आणि जलस्रोत संवर्धन उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. “वर्ल्ड प्लंबर्स डे” निमित्त प्लंबरांचा सन्मान केला जाईल आणि ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आयटीआय आणि स्थानिक प्लंबरांना प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
“जल संचय” या उपक्रमांतर्गत जलस्रोतांची स्वच्छता, संरक्षण आणि पुनर्भरणासाठी समुदायाच्या नेतृत्वाखाली जलसाठे व जलग्रहण क्षेत्रांची स्वच्छता, पारंपरिक जलरचनांचे पुनरुज्जीवन आणि पाणी पुनर्भरणाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. “मै भी जल रक्षक” या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करून तरुण जल संरक्षकांची फळी तयार केली जाणार आहे.
जल महोत्सवाची प्रभावी अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात करण्याचे निर्देश गट विकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. संबंधीत यंत्रणांनी लोकसहभागातून जल महोत्सव ग्रामस्तरावर उत्साहात साजरा करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.
पाणी ही केवळ पायाभूत सुविधा नसून ती स्थानिक संस्कृती, परंपरा, उपजीविका आणि सामुदायिक जीवनाशी निगडित महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे जल जीवन मिशन आता केवळ पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यापुरते मर्यादित न राहता, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, सामूहिक जबाबदारी वाढावी आणि ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक मजबूत व शाश्वत व्हावी यासाठी ‘जल महोत्सव आणि ‘जल अर्पण ही संकल्पना राबविण्यात येत आहे माणिक चव्हाण, प्रकल्प संचालक जि. प. भंडारा विभागानी कळविले आहे.





