गोंदिया : सामाजिक वनीकरण विभागांतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामांमध्ये शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पांढराबोडी ते रतनारा, लोहारा ते रतनारा व भानपूर कालवा परिसरातील नॉर्मल कॅम्पअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामांबाबत ही तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सामाजिक वनीकरण गोंदिया परिक्षेत्रात कार्यरत असताना वनपाल एम. डब्ल्यू, रामटेके यांनी २०२० ते २०२४ या कालावधीत लाखो रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मजूर प्रत्यक्षात कामावर नसतानाही त्यांच्या नावावर मजुरीची रक्कम काढून धनादेश देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच काही मजुरांकडून रक्कम काढून ती संबंधितांकडे देण्याचे काम घिवारी येथील एक व्यक्ती करत असल्याचा आरोप केला आहे.
काही मजुरांना कामावरून कमी करण्याची धमकी देऊन पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीच्या कामासाठी महिलांकडून खड्डे खोदकाम करून घेतल्यानंतर त्यांना कामावरून कमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सन २०२१-२२ तसेच २०२२-२४ या कालावधीत प्रत्यक्ष कामावर न आलेल्या मजुरांच्या नावाने धनादेश काढून रक्कम वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी लोहारा येथील कन्हैयालाल रतनलाल चिखलोंढे यांनी सामाजिक वनीकरण कार्यालयाला केलेल्या तक्रारीतून केली आहे.
चौकशीनंतर दोषींवर कारवाई होणार
या प्रकरणाची आवश्यक ती चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यासाठी प्रकरण विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, गोंदिया यांच्याकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती उपवनसंरक्षक, गोंदिया वन विभाग यांनी दिली.





