25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी गडचिरोली पोलिसांच्यावतीने संवाद बैठकीचे आयोजन

सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी गडचिरोली पोलिसांच्यावतीने संवाद बैठकीचे आयोजन

0
83
गडचिरोली ,दि.१२- गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दलात कार्यरत व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. त्याच अनुषंगाने पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्याशी सुसंवाद वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीसाठी गडचिरोली पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले 45 पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उपस्थित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत त्याअनुषंगाने उपाययोजना करुन अडचणी सोडविल्या जाणार असल्याचे सांगितले.  तसेच सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्याशी सातत्याने संवाद ठेवून त्यांच्या अडचणी व सूचनांवर सकारात्मक विचार केला जाईल असेही सांगितले. बैठकीदरम्यान उपस्थित सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस दलात सेवा बजावत असताना आलेले अनुभव, विविध आव्हाने तसेच त्यावर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आपले विचार व्यक्त केले. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गेल्या 40 वर्षाच्या काळात बजावलेल्या खडतर सेवेसाठी त्यांचे आभार मानण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी माओवाद विरोधी अभियानामूळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद जवळजवळ संपुष्टात येऊन केंद्रिय समिती सदस्य सोनु उर्फ भूपती याने देखील आत्मसमर्पण केल्याबद्दल सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे.
यावेळी आयोजित संवाद बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) स्वप्निल इज्जपवार तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.