24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ येत्या काळात नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात दिसणार अधिक वन्यजीव

येत्या काळात नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात दिसणार अधिक वन्यजीव

0
134

गोंदिया, दि.18 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात येत्या काळात अधिक वन्यजीव आढळतील असे या क्षेत्राचा अभ्यास दौऱ्या दरम्यान झालेल्या निरीक्षणात आढळले.
मंगळवारी जिल्ह्यातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक तसेच सामाजिक माध्यमासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या निरीक्षणातून पत्रकारांनी प्रतिक्रिया नोंदवल्या.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचा बफर झोन क्षेत्राचे प्रशासकीय हस्तांतरण लवकरच होणार आहे. बफर झोनमध्ये जवळपास 185 गावांचा समावेश व्याघ्र राखीव क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिक वन्यजीव आढळून येतील तसेच स्थानिक लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.
क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी अभ्यास दौऱ्या दरम्यान आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले. त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये (एन.एन.टी.आर.) होत असलेला बदल शासनाच्यावतीने वन्यजीव संवर्धन संरक्षणासाठी घेण्यात येणारे निर्णयांची माहिती दिली. यावेळी एन.एन.टी.आर. साकोलीचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर, वन्य विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र (एन.एन.टी.आर.) हे वाघांसाठी अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे. वाघ एका भागातून दुसऱ्या भागात स्थानांतरण करताना एन.एन. टी.आर. या क्षेत्रातून होऊनच त्याला जावे लागते. त्यामुळे एन.एन.टी.आर. चे विशेष महत्त्व अधोरेखित होते. येत्या काळात वाघांचा अधिवास या भागात व्हावा आणि तो वाढावा यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
यासह या भागात 125 जातींचे फुलपाखरू आढळून येतात. प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडू नये यासाठी पानवठयाजवळ सोलर बसविण्यात आले असून वन्यजीवांना वर्षभर मुबलक पाणी मिळावे याची काळजी घेण्यात आलेली आहे.
या जंगलात चितळ सोडण्यात आलेले असून पर्यटकांना सहज दिसतील अशा परिक्षेत्रात त्यांचा अधिवास आहे.
बफर क्षेत्र वाढल्याने नागरिक आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढू नये तसेच वन्यजीवांना ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही सांगण्यात आले.पत्रकारांच्या या अभ्यास दौऱ्यामुळे शासन व माध्यम यांच्यातील समन्वय दृढ करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वन्य विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.