आमगाव-. तालुक्यातील किडंगीपार गावातील दारूदुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी शेकडो ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या १० एप्रिल रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामवासियांनी दिला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
दारूदुकानांविरोधात प्रारंभी शुक्रवारी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीचा परिसर, मुलांचे उद्यान, हनुमान मंदिराचा परिसर आणि अंगणवाडी परिसरात महिला व गावकऱ्यांच्या सभा घेतल्या. त्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. किडांगीपार गावाची लोकसंख्या अंदाजे २ हजार ५०० असून, येथील बहुतेक रहिवासी मजूर, हमाल आणि शेतमजूर आहेत.
आमगावपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि गोशाळा यांसारख्या मूलभूत सुविधा आहेत. गावाच्या प्रगतीसाठी आणि
निरोगी सामाजिक वातावरणासाठी गावात दारूचे दुकान नसावे, असा दृढनिश्चय महिलांनी व्यक्त केला. जागरूक महिला, तरुण आणि गावकऱ्यांनी उचललेले हे पाऊल सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, मोर्चाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर सकाळपासूनच स्थानिक प्रशासन आणि पोलिसदल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त मोर्चासाठी तहसील तैनात होता. परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हा मोर्चा किडंगीपार येथून गोंदिया रोड, आंबेडकर चौकमार्गे निघून तहसील कार्यालयात पोहोचला. पोलीस प्रशासनाकडून आधीच कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
… तर सामूहिक आत्मदहनाचा दिला इशारा
गावातील दारू दुकान त्वरित बंद करण्यासाठी निवडणुका घ्याव्यात आणि निवडणुका होईपर्यंत दारू दुकाने बंद ठेवावे. जर प्रशासनाने टाळाटाळ करणे सुरूच ठेवले, तर १० एप्रिल रोजी रास्तारोको केले जाईल. रेल्वे रुळांवर झोपू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. याउपरांतही प्रशासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करणार असा इशारा संतोष डोंडे, चुनेश्वरी हरिनखेडे, प्रमिला खरोले, यमन पुसम आणि रूपकला भांडारकर यांनी व संतप्त गावकऱ्यांनी दिला आहे.





