अर्जुनी-मोरगाव- तालुक्यातील समता नगर कॉलनी येथे राहणाऱ्या कु. अंजली नानाजी पिंपळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन करत तालुका कृषी अधिकारी पदावर निवड मिळवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, अंजलीच्या या यशाने अर्जुनी-मोर.च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अंजली पिंपळकर यांनी आपले शालेय शिक्षण अर्जुनी-मोर. येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर वरोरा येथील आनंदवन कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी उत्कृष्ट गुणांनी संपादन केली. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेश घेत आपला शैक्षणिक प्रवास अधिक भक्कम केला.
विशेष म्हणजे, कोणतेही खासगी कोचिंग वर्ग न लावता आणि एम.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करतानाच अंजली यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. चिकाटी, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून अनेक स्पर्धा परीक्षार्थींना प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
अंजलीचे वडील नानाजी पिंपळकर हे खाजगी कंत्राटदार असून, आई माधुरी पिंपळकर या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. या दाम्पत्याने मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले, त्याचेच फळ आज त्यांच्या यशातून दिसून येत आहे.
अंजलीचा मोठा भाऊ अविनाश पिंपळकर यांनीही शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवले असून त्यांनी रामटेक येथील KITS अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते गडचिरोली येथील मृद व जलसंधारण विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
पिंपळकर कुटुंबातील दोन्ही मुलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंजली पिंपळकर यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





