
– विद्यार्थी अनेक समस्यांनी त्रस्त
गोंदिया,2 एप्रिल- येथील ओबीसी वसतिगृहात गेल्या १० दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत असून, त्यांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी टंचाईव्यतिरिक्त या वसतीगृहात अनेक समस्या आवासून उभ्या असून या समस्यांचा सामना त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून करावा लागत आहे. याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे. दरम्यान, सदर समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
कुडवा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागा द्वारे इतर मागास वर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलांचे वसतिगृह असून या वसतिगृहात १२ वी नंतरचे शिक्षण घेणारे ७१ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. नियमानुसार, या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता आणि भोजन खर्च शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या पाच ते सह महिन्यांपासून कसल्याच प्रकारचा भत्ता किंवा खर्च या विद्यार्थ्यांना दिला जात नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, वसतिगृहाच्या इमारतीमधील बोअरवेल पूर्णपणे कोरडी पडल्याने गेल्या १० दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रशासनाने टँकरची सोय केली असली, तरी दिवसातून एकदाच टँकर येत असल्याने टंचाई कायम आहे. त्यातच विद्यार्थ्यांना दुसर्या मजल्यावर बादलीने पाणी वाहून न्यावे लागत आहे. पाण्याच्या समस्येसोबतच इतरही गंभीर समस्या आहेत. इमारत मालकाने स्वच्छतागृहात खोदकाम केले असून, परिसरात सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. कडक उन्हाळा असूनही शासनाकडून कुलरची व्यवस्था नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पैशाने कुलर खरेदी केली आहे. मात्र, विज व पाण्याअभावी हे कुलूर पडून असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. दरम्यान, या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित भत्ता त्वरित देण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
यांनी दिली भेट…
ओबीसी वसतीगृहात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळताच ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे,प्रेमलाल साठवणे,युवा बहुजन मंचचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, प्रमोद गुडधे, प्राची गुडधे आदींनी या वसतीगृहाला भेट देऊन पाहणी केली असता त्यांना येथील वास्तूस्थिती दिसून आली.
आंदोलनाचा पवित्रा
शासनाने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तर सुरू केले आहे, मात्र तिथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसोबतच इतर अनेक सुविधांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. जर विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या आणि इतर समस्या तातडीने सोडवल्या गेल्या नाहीत, तर ओबीसी अधिकार मंचच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. याबाबत समाज कल्याण उपायुक्तांना अवगत करण्यात आले असून त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.– खेमेंद्र कटरे, संयोजक, ओबीसी अधिकार मंच
वसतिगृहाची इमारत विक्रीला?
ज्या इमारतीत भाड्याने हे वसतिगृह चालवले जात आहे, त्या इमारतीवर घर मालकाने ’इमारत विकणे आहे’ असा फलक लावला आहे. त्यामुळे जर इमारत विकली गेली तर या ७१ विद्यार्थ्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वसतिगृहाचे गृहपाल एम. जी. गिरी यांनी इमारतीचा करारनामा ३ वर्षाचा असल्याचे सांगितले.
ओबीसी वसतीगृहातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरीता सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येत असून नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी टॅंकरद्वारे मुबलक पाणी पुरवट्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे,घरमालकाशी सुध्दा पाणी पुरवठाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपायुक्त किशोर भोयर यांनी दिली.





