29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ हिरडामाली-मोहगाव मार्गाची दुरवस्था;आदोलनाचा इशारा

हिरडामाली-मोहगाव मार्गाची दुरवस्था;आदोलनाचा इशारा

0
42

blank

गोरेगाव- हिरडामाली ते मोहगाव या दोन गावांना जोडणारा मुख्य मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रस्त्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून, संपूर्ण रस्ता खड्यात गेला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
हिरडामाली ते मोहगाव या जर्जर रस्त्याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज शाळेत जाणाऱ्या मुलांना जीव मुठीत धरून खड्डे आणि चिखलातून वाट काढावी लागते. अनेकदा सायकलवरून जाताना किंवा पायी चालताना मुले घसरून पडत आहेत, ज्यामुळे त्यांना दुखापत होत आहे. वारंवार तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर खड्डे इतके खोल झाले आहेत की, काही ठिकाणी रस्ता नेमका कुठे आहे हेच समजत नाही. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे वारंवार नुकसान होत असून वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा अभाव आणि रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहन चालकांना सतत मोठ्या दुर्घटनेची भीती सतावत असते.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

blank