नवेगावबांध,दिनांक 11 एप्रिल- महसूल विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१” मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले.
या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारापर्यंत जाऊन सोडविणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हे होते. महसूल विभागाने या माध्यमातून विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवत अनेक प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावली.
लायकराम भेंडारकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शासन आता सामान्य नागरिकांच्या दारी येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा शिबिरांचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या अडचणी त्वरित सोडवून घ्याव्यात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात विविध गरजू नागरिकांना जात प्रमाणपत्र, डोमेसाइल प्रमाणपत्र, घरकुल सनद, उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थी मंजुरी पत्र, जिवंत सातबारा, नवीन रेशन कार्ड तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
कार्यक्रमाला रचनाताई गहाणे जि.प. सदस्य, अनिरुद्ध कांबळे तहसीलदार, हिराताई पंधरे सरपंच नवेगाव बांध, होमराज पुस्तोडे पं.स. सदस्य, किशोर तरोणे माजी जि.प. सदस्य, दिपाली कापगते सरपंच देवळगाव, शारदा नाकाडे माजी पं.स. सदस्य, खुशाल काशिवार माजी संचालक, दयाराम लंजे सरपंच पांढरवानी, मुलचंद गुप्ता तंटामुक्ती अध्यक्ष यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच नायब तहसीलदार कावळेजी, मंडळ अधिकारी वाघधरेजी आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे शासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





