गोंदिया :-मागील दोन ते तीन दिवसांपासून अचानक बदललेल्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने रब्बी पिकांची लागवड केली होती, मात्र अचानक आलेल्या खराब हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांची मेहनत व खर्च वाया गेला आहे.
शेतकरी चिंतेत असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेले आमदार विनोद अग्रवाल यांनी तात्काळ तुमखेड़ा व कारंजा येथील शेतक-यांच्या नुकसानग्रस्त शेतांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा व्यक्त केली.यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबधित गावातील तलाठी, कृषि सहाय्यक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाला तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणीही आ. विनोद अग्रवाल यांनी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रामुख्याने आ. विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपाताई चंद्रिकापुरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार समशेर पठान, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानवडे, तालुका कृषी अधिकारी नेहा आढव, तलाठी व कृषि सहाय्यक आदी उपस्थित होते.





