23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ 9 मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत

9 मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत

0
63

गोंदिया, दि. 8 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या वतीने दि. 9 मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडणार आहे.

या लोक अदालतमध्ये प्रलंबित तसेच खटला दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे सामंजस्याने तडजोडीद्वारे निकाली काढण्याचे आवाहन पक्षकारांना करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित दिवाणी प्रकरणे, तडजोड करण्यायोग्य फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई दावे, भूसंपादन प्रकरणे, महसूल विषयक प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक वाद तसेच वसुलीची प्रकरणे हाताळण्यात येणार आहेत.

लोक अदालतमध्ये न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या पॅनेलद्वारे पक्षकारांना मार्गदर्शन व सहाय्य केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच लोक अदालतमध्ये दिले जाणारे निर्णय अंतिम स्वरूपाचे असल्याने प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेशिवाय जलद, सुलभ आणि किफायतशीर न्याय मिळण्यास मदत होते.

blank