“आम्ही देखील गांधीवादीच, पण सशस्त्र” – भूपती
“आरोग्याची सत्ता लोकांच्या हाती देणे, ही आमची आरोग्य-स्वराज्य क्रांती” – डॉ. अभय बंग
गडचिरोली – लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी स्वयंपूर्ण बनवणे, आरोग्याची सत्ता त्यांच्या हाती असणे आणि त्यांना व्यसनापासून दूर ठेवणे हे क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊलच आहे, असे मत ‘सर्च’चे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी नेते भूपती, दीपा सल्लाकुला, लीना चिंताकिंदी आणि विवेक इर्री यांनी शुक्रवारी ‘सर्च’ला सदिच्छा भेट दिली.
यावेळी डॉ. बंग म्हणाले, “१९७० आणि ८० च्या दशकात भारतातील अनेक युवकांच्या मनात क्रांतीचा विचार प्रभावी होता. क्रांतीचे ध्येय कोणत्या पद्धतीने साकारणार यात मात्र मतभिन्नता होती. लोकांच्या हाती सत्ता जावी हे क्रांतीच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल असते. आम्ही त्यासाठी गांधीवादी पद्धतीने आरोग्य-स्वराज्यसाठी काम करतो.”
भूपती म्हणाले, “माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मी १९७३पासून विद्यार्थी संघटना व पुढे माओवादी संघटनेद्वारे क्रांती करायला सक्रीय झालो. गांधीवाद्यांप्रमाणे आमचे ध्येय देखील समतायुक्त समाज निर्माण करणे हे होते. एका अर्थाने आम्हीही गांधीवादीच, पण सशस्त्र!”
भूपती पुढे म्हणाले, “सोव्हिएट युनियन आणि चीनमध्ये सरकार पुरस्कृत भांडवलाशाहीचा उदय यामुळे भारतातील माओवादी चळवळीची पडझड सुरू झाली. २००० नंतर फक्त दंडाकरण्यातच ही चळवळ टिकली होती. हिंसेच्या मार्गाने क्रांती होणार नाही, याची मला जाणीव २०००मध्येच झाली, आणि मी संघटनेत तशी भूमिका वेळोवेळी मांडली होती.”
आत्मसमपर्णानंतर आता गडचिरोलीतच स्थायिक होण्याचा विचार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. “जवळपास ४० वर्षं मी गडचिरोलीत कार्यरत आहे. आता घरी जाऊन माझ्यासाठी काय आहे, हे विचारू शकत नाही. मला गडचिरोलीत आणि येथील माणसांमध्येच राहायचे आहे.” ‘सर्च’ने गडचिरोलीत १९८८ ते १९९३मध्ये दारूबंदीसाठी केलेल्या आंदोलनातून नक्षलवादी चळवळीनेही प्रेरणा घेतली होती, अशी आठवण भूपती यांनी सांगितली.
गडचिरोलीतील खाण उद्योग आणि स्टील प्रकल्प यामुळे होणारे विस्थापन आणि स्थानिक संस्कृती, पर्यावरणाचे होणारे नुकसान यावर शासनासोबत समन्वयाने मार्ग काढला पाहिजे. पेसा कायद्यानुसार अशा प्रकल्पांत स्थानिक आदिवासींनी भागिदारी मिळावी, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन व्हावे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
यावेळी ‘सर्च’च्या सहसंस्थापक डॉ. राणी बंग, संचालक डॉ. आनंद बंग, उपसंचालक डॉ. आरती बंग, ‘निर्माण’चे संचालक अमृत बंग, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल गणेश नालगुंडा उपस्थित होते.





