26.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ फेसबुकवर महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

फेसबुकवर महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

0
81

गोंदिया,10 मे-सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरेश बावनकर नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर खोटी, बनावट आयडी तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी जनतेच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली असली तरी कठोर कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर त्याने केलेल्या पोस्टला लाईक, कमेंट्स व शेअर करणाऱ्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी विचार मंच, गोंदिया जिल्हाच्या वतीने शनिवारी ९ मे रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी माजी जि. प. सभापती विश्वजित डोंगरे, राजेश नंदागवळी, अजित मेश्राम, हितेश डोंगरे, किशोर मेश्राम, शैलेश जांभूळकर, व्यंकट खोब्रागडे, धनंजय वैद्य, अतुल सतदेवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डोंगरे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फेसबुकवर दिनेश ब्राह्मणकर या आयडीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यावर सडक अर्जुनी येथील रोशन बडोले यांनी ८ मे रोजी डुग्गीपार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरेश बावनकर या व्यक्तीने फेसबुकवर दिनेश ब्राह्मणकर या नावाने बनावट आयडी तयार करून हे कृत्य केल्याचे पुढे आले.
यावर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक केली. मात्र, सदर आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केलेला नव्हता. दरम्यान, सर्व समाजबांधवांनी एकत्र येत याप्रकरणी ९ मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असता सदर गुन्ह्यात वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी आरोपी गौरेश बावनकर याने केलेले कृत्य हे घृणास्पद असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी व त्याने केलेल्या पोस्टवर इतरांनी केलेल्या कमेंट्स, लाईक, शेअर आदींचा तपास करून संबंधितांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी समाजबांधवांनी केली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

blank