गोंदिया – जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात लोक जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलन करत असतात. अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मागील चार दिवसांत तिसरी गंभीर घटना घडल्यानं संपूर्ण तालुका हादरला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका मजुरावर अस्वलाने अचानक जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज 12 मे रोजी मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. तीरखुरी सहवन क्षेत्र भाग क्रमांक 9 अंतर्गत नियत क्षेत्र क्रमांक 3 मधील भरणोली जंगल परिसरात ही घटना घडली. या घटनेत दीपक रतिराम गावळे (वय 40) रा. भरणोली हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.सकाळी तेंदूपत्ता गोळा करण्याचं काम सुरू असताना दाट जंगल परिसरातून अचानक अस्वल बाहेर आलं आणि दीपक गावळे यांच्यावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. अस्वलाने गावळे यांच्या मांडीवर, शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या इतर मजुरांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. मजुरांच्या आरडा ओरडीमुळे अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर जखमी अवस्थेतील दीपक गावळे यांना सहकान्यांनी जंगलाबाहेर आणून तातडीनं उपचारासाठी केशोरी आरोग्य केंद्रात दाखल केले. अजून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी जंगलात जाताना सतर्क राहावे, एकटे जाऊ नये तसंच वन्यप्राण्याचा वावर दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





