रब्बी हंगामातील मका व धान खरेदी अडचणींवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
अर्जुनी-मोर.-रब्बी हंगामातील मका व धान खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत खरेदी केंद्रांवरील समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना मका व धान खरेदी केंद्रांवर भेडसावणाऱ्या अनेक अडचणींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विशेषतः खरेदी प्रक्रियेत होणारा विलंब, वजनकाट्यांची अपुरी उपलब्धता, शेतकऱ्यांच्या मालाच्या भरणा प्रक्रियेत होणारा उशीर, गोदाम क्षमतेची कमतरता तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, “शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक खरेदी केंद्रावर पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पेमेंट वेळेत मिळेल याची खात्री करा.” तसेच खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनीही विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रेमजी रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनीचे सभापती अविनाश काशिवार, भाजपा गोंदियाचे महामंत्री प्रशांत शहारे, विजय कापगते, माजी जि.प. सदस्य रतीराम राणे, जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी इंगळे, टीडीसीचे विभागीय व्यवस्थापक धीरज चौधरी, चेतन नाकाडे, ललित डोंगरवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.रब्बी हंगामातील खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





