23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ मायनिंगविरुद्ध सामूहिक लढ्याचा निर्धार !-डॉ. देवाजी तोफा

मायनिंगविरुद्ध सामूहिक लढ्याचा निर्धार !-डॉ. देवाजी तोफा

0
47

देवरी, दि.२१: तालुक्यातील मगरडोह (गट ग्रामपंचायत) येथे वनहक्क कायद्याचे प्रवर्तक डॉ. देवाजी तोफा यांनी नुकतीच  सदिच्छा भेट देऊन स्थानिक सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत आदिवासी संस्कृतीतून होणारे वन संवर्धन, जंगलाचे शाश्वत व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट मायनिंग (खाणकाम) व व्याघ्र प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर सखोल चर्चा करुन सामूहिक लढ्याचा निर्धार करण्यात आला.
मगरडोह ग्रामसभा विरुद्ध वनविभाग हा खटला २०२१ पासून न्यायप्रविष्ट असून, डॉ. तोफा यांच्या मार्गदर्शनामुळे या लढ्याला नवी गती मिळाली असल्याचे पेसा अभ्यासक विलास भोगारे यांनी सांगितले.
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पदाधिकारी बैठकीत डॉ. देवाजी तोफे म्हणाले, “आदिवासी आणि जंगलाचे नाते अतूट आहे. आज मायनिंग व व्याघ्र प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिक लोकांचे हक्क हिरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याविरोधात वनहक्क कायद्याच्या ताकदीने आपल्याला एकजूट होऊन लढावे लागेल.” या प्रसंगी जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मायनिंगला तीव्र विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीला मगरडोहचे सरपंच, उपसरपंच, वनहक्क समितीचे अध्यक्ष, सचिव आणि बांबू, तेंदू व मत्स्य व्यवस्थापनाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी गावकऱ्यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी सामूहिक लढ्याची शपथ घेतली.

blank