वासंतिक व्याख्यानमालेच्या समारोपीय पुष्पात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचा जागर
वाशिम, दि. २6 मे -मराठी ही केवळ एक भाषा नसून तब्बल २०० हून अधिक बोलीभाषांचे समृद्ध भाषाकुल आहे. या बोलीभाषाच मराठीचे मूळ असून त्यातूनच मराठी अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे अभिजात मराठी भाषा अधिक सक्षम आणि व्यापक करण्यासाठी विविध बोलीभाषांचे संवर्धन करणे ही आजची खरी गरज आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आयोजित वासंतिक व्याख्यानमालेच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते. यावेळी साहित्य, भाषा, संस्कृती आणि मराठीच्या जतन-संवर्धनाविषयी त्यांनी अभ्यासपूर्ण आणि परखड विचार मांडले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, जगामध्ये सुमारे साडेसहा हजार भाषा बोलल्या जातात आणि त्यामध्ये मराठी भाषेचा पहिल्या दहामध्ये समावेश होतो, ही मराठी भाषेच्या अभिजाततेची मोठी पावती आहे. मात्र, आज अनेक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या बोलीभाषांमधील शब्द, म्हणी, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ठेवा जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. हरवत चाललेले शब्द संकलित करून त्यांचे डिजिटल दस्तावेजीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा विभाग यासाठी प्रयत्नशील आहे; मात्र या कार्यात सर्वसामान्य लोकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे, असे सांगताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील विविध बोलीभाषांवर अधिक संशोधन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच मराठीच्या विविध बोलीभाषांतील लुप्त होत चाललेल्या शब्दांचा संग्रह करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
मराठी साहित्याच्या परंपरेविषयी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, मराठी साहित्याला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. पूर्वीच्या साहित्यामधील गोडवा, शब्दांची ताकद आणि भाषेतील संस्कार आज कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पूर्वी महाराष्ट्रात शब्दांचा दुरुपयोग होत नव्हता. आज मात्र शब्दांची किंमत उरलेली नाही. विशेषणे सहजपणे कुणालाही लावली जातात. ‘महान’ कुणाला म्हणायचे, याचाही विचार होताना दिसत नाही, असा परखड प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मराठी भाषेसमोर अनेक आव्हाने असली तरी प्रगत साहित्यनिर्मिती, संशोधन आणि डिजिटल माध्यमातील वापर या सर्व क्षेत्रांत मराठीचे पाऊल आजही पुढे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी “मराठी मुळातच अभिजात आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, मागील अनेक दशकांपासून शासनाच्या कोणत्याही थेट सहकार्याविना मराठीत ४०० हून अधिक दिवाळी अंक स्वयंप्रेरणेने प्रकाशित होतात, ही मराठी भाषेच्या सामर्थ्याची प्रचिती आहे. “माय मराठीची ताकद अफाट आहे. दिवसेंदिवस मराठीचा विश्वकोश विस्तारत आहे. डिजिटल युगात आपण सर्वांनी मराठीच्या समृद्धीसाठी योगदान द्यायला हवे,” असे आवाहनही त्यांनी केले.
पाच दिवस चाललेल्या वासंतिक व्याख्यानमालेविषयी बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, वाशिमसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात या व्याख्यानमालेच्या माध्यमातून साहित्य आणि वैचारिक चळवळीचा नवा पायंडा पडला आहे. “शतकानुशतके हे विचारपीठ जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीला आणि मराठी भाषेच्या ज्ञानज्योतीला अधिक प्रखर करण्याचे काम करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वासंतिक व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबईचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी शिवछत्रपतींचे किल्ले : नामांकनापासून मानांकनापर्यंत या विषयावर सविस्तर विवेचन केले. जागतिक वारसा दर्जासाठी किल्ल्यांचा झालेला प्रवास त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला.
दुसऱ्या पुष्पात ख्यातनाम कवी इंद्रजीत भालेराव यांनी शोध कृषी संस्कृतीचा या विषयावर व्याख्यान दिले. “मारून नव्हे तर पेरून खाण्याच्या संस्कृतीतूनच कृषी आणि मानवी संस्कृतीचा उगम झाला,” असे सांगत त्यांनी कृषी संस्कृतीचे तात्त्विक आणि सामाजिक पैलू उलगडले.
तिसऱ्या पुष्पात वाशिमचे ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी वाशिम जिल्ह्याच्या वाङ्मयीन परंपरेवर प्रकाश टाकला. यावेळी आयोजन समितीच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याच दिवशी ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रशांत मोरे यांनी आई तुझा हात परिस या विषयावर काव्यगायन सादर केले. महाराष्ट्रातील विविध ग्रामीण बोलीभाषांतील कवितांचे सादरीकरण त्यांनी आपल्या सुमधुर आवाजातून केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते भावुक झाले.
चौथ्या पुष्पात पुणे येथील माधुरी यादवाडकर यांनी नव्या काळाच्या संदर्भातून आनंददायी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिक युगात मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी, बदलती आव्हाने कशी पेलावीत, यावर त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल येथे पार पडलेल्या या पाच दिवसीय व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी संजय ससाणे, विठ्ठल भुसारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





