26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ बोपाबोडी गावातील दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

बोपाबोडी गावातील दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

0
138

गोंदिया, दि.1 : सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी गावात नियोजित करण्यात आलेले 02 बालविवाह वेळीच हस्तक्षेप केल्याने होणारे बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले.डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निर्वाण आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी मुकेश पटले यांनी स्थानिक पातळीवर माहिती गोळा करुन प्रशासनाला वेळीच सतर्क केल्याने सदर बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले.या संदर्भात डुग्गीपार पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधिक्षक गोरख भामरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांचे नेतृत्वात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, दामिनी पथक आणि डुग्गीपार पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने दि.29 मे 2026 रोजी ही कारवाई पार पाडली.
बोपाबोडी येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांचेकडुन अल्पवयीन बालकांचे वयाचे पुरावे प्राप्त करुन घेत प्राप्त कागदपत्रांच्या अनुषंगाने दोन्ही बालकांचे वय बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार कमी असल्याचे दिसुन आले. बाल कल्याण समितीच्या सदस्य जयश्री कापगते आणि समुपदेशक पुजा डोंगरे यांनी विवाहस्थळी पोहोचुन वर-वधु पक्षाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत बोपाबोडी येथे बोलावुन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आंगणवाडी सेविका, आशावर्कर आणि ग्राम बाल संरक्षण समितीचे इतर सदस्य यांच्या समक्ष बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशिर शिक्षेची तरतुद समजावून सांगितले. मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे लेखी हमीपत्र पालकांकडून लिहुन घेण्यात आले. होऊ घातलेल्या बालविवाहातील दोन्ही कुटुंबियांशी संवाद साधुन समजुत काढली व मुला-मुलींच्या शिक्षणासाठी समुपदेशन केले.दामिनी पथक, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीसारख्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झाली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी व बोपाबोडी ग्रामपंचायत आणि आशावर्कर यांच्या संयुक्त देखरेखीखाली मुलांचा पाठपुरावा केला जाणार आहे. बोपाबोडी येथील बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी रविंद्र टेभुर्णे क्षेत्रीय कार्यकर्ता धर्मेंद्र भेलावे, ISWS चे कुथेकर, दामिनी पथकाची संपूर्ण टिम उपस्थित होते.

blank