
तिरोडा, ता. ११: तालुक्यातील मांडवी, बिरोली,चांदोरी, घाटकुरोडा तसेच परिसरातील इतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने धापेवाडा उपसा सिंचन बॅरेजचे दरवाजे तातडीने उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी कवलेवाडा जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी धापेवाडा सिंचन विभाग टप्पा क्रमांक-१ च्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
सध्या परिसरातील नदीपात्रातील पाणी आटल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना घरगुती वापरासाठी तसेच जनावरांच्या पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी महिलांना आणि शेतकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे
लागत असल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. धापेवाडा बॅरेजमधून पाणी सोडल्यास नदीपात्रात पुन्हा पाण्याचा प्रवाह सुरू होईल आणि मांडवी, बिरोली, चांदोरी, घाटकुरोडा यांसह नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळेल. तसेच नागरिक आणि पशुधनासाठी निर्माण झालेली पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामुळे जलस्रोत कोरडे पडले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने निर्णय घ्यावा, धापेवाडा बॅरेजचे गेट उघडून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी केली आहे.




