29.1 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड

0
52

गोंदिया : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील २१,६०६ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र, यात ६९९ मृतक शेतकऱ्यांचा नावाचा समावेश होता. ती वगळून आता २० हजार ९०७ शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम मंगळवारी (दि. २३) पूर्ण करण्यात आले आहे. याद्या पडताळणी करून आधार प्रमाणीकरण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी कर्जमुक्ती संबंधी काढलेल्या जीआरनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ हा कालावधी निश्चित केला आहे. या नव्या निकषामुळे आधी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४६ हजारांवरून २१६०६ वर आली. जवळपास अर्धे शेतकरी नवीन निकषामुळे अपात्र ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचीच पूर्तता केली जात आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, आठही तालुक्यांतील कर्जमाफीस ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. पात्र कर्जमाफीस पात्र एकूण २० हजार ९०७ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी दिली.
१ लाख ४ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान
या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १ लाख ४ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.
मृत ६९९ शेतकऱ्यांची नावे वगळली
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करताना या याद्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात ६९९ शेतकरी मृतक आढळल्याने त्यांची नावे यातून वगळण्यात आली.