27.4 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home विदर्भ आम्हाला डावलून जिंकून दाखवाच!

आम्हाला डावलून जिंकून दाखवाच!

0
12

साकोली: कोहळी समाजावर वारंवार राजकीय अन्याय केला जात आहे. शब्द देऊनही डावलले जात आहे. हा अन्याय आतापर्यंत खूप झाला. यापुढे सहन केला जाणार नाही. आम्ही कोहळी समाजाची राजकीय ताकद प्रत्येक पक्षांना दाखवू, यापुढे आम्हाला डावलून निवडणुका जिंकून दाखवाच, असे थेट आव्हान पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय कोहळी समाज विकास मंच नागपूरचे अध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी दिले.
आपल्या हक्कांसाठी आणि पूर्व विदर्भातील कोहळी समाजाच्या संघटित शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी केंद्रीय कोहळी समाज विकास मंडळ (नागपूर) आणि कोहळी पाटील संघर्ष मंच यांच्या संयुक्त विद्यमाने साकोलीत २९ जूनला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतून समाज संघटनेच्या नेत्यांनी वरील इशारा दिला. यावेळी समाजाचे नेते ललित बाळबुद्धे, नाना नाकाडे, अमोल मुंगमोडे, प्रकाश बाळबुद्धे, प्रणय खुणे, गजानन डोंगरवार, डॉ. श्याम हटवादे आदी उपस्थित होते.बाळबुधे म्हणाले, यापूर्वी समाजाचे नेते पक्ष प्रथम नंतर समाज या न्यायाने चालत होते; परंतु आता प्रथम समाज नंतर पक्ष हे धोरण अंगीकारले जाईल. दोन लोकसभा आणि सात विधानसभा क्षेत्रात कोहळी समाज निर्णायक असून, पूर्व विदर्भातील जवळपास ४०० हून अधिक गावांमध्ये कोहळी समाजाचे प्राबल्य असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. कोहळी समाजाचे समन्वयक ललित बाळबुद्धे यांनी राजकीय पक्षांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आमच्या समाजाला फक्त मतदानापुरते गृहित धरले जाते.
राजकीय पक्षांकडून अल्पसंख्याक म्हणून आमची उपेक्षा केली जाते. हा समाज प्रामुख्याने ८० टक्के भाजपचा पारंपरिक मतदार असून उर्वरित २० टक्के काँग्रेस व राष्ट्रवादीकडे विभागलेला आहे. या मोठ्या संख्याबळाची ताकद पाठीशी असतानाही राजकीय पक्षांकडून समाजाला नगण्य समजून राजकीय वाटा शून्यावर आणला जातो, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मेळाव्यात दिवसभर झाले राजकीय विचारमंथन
दरम्यान दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात राजकीय विषयांवर आणि पुढील दिशा काय असावी यावर विचारमंथन झाले. निवडणुकांमध्ये नेत्यांकडून समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला जातो. समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाकारले जाते. या मुख्य मुद्यावरच दिवसभर हे विचारमंथन झाले. दुपारी सुरु झालेला हा समाजमेळावा सायंकाळी ८ वाजतापर्यंत सुरु होता. यात अनेकांनी मते मांडली. समाजातील तरुणांना राजकीय व्यासपीठावर प्रतिनिधीत्व मिळावे असे मतही यावेळी मांडण्यात आले. विशेषतः अलीकडेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपाकडून आलेल्या अनुभवाबद्दल असंतोष दिसला