25.2 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ “हर हर महादेव”च्या जयघोषात गोंदियाहून बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी भाविकांचा अमरनाथ यात्रेसाठी प्रस्थान

“हर हर महादेव”च्या जयघोषात गोंदियाहून बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी भाविकांचा अमरनाथ यात्रेसाठी प्रस्थान

0
25

सलग १५ वर्षांपासून यात्रा करणाऱ्या भाविकांचा सहभाग; रेल्वे स्थानकावर भावपूर्ण निरोप ३ जुलैपासून चंदनवाडी मार्गे पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ

गोंदिया: पवित्र श्री अमरनाथ यात्रेच्या शुभारंभानिमित्त आज गोंदिया शहरातून बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी भाविकांचा एक विशेष जत्था मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने रवाना झाला. हा जत्था ३ जुलै रोजी चंदनवाडी येथे पोहोचून पायी अमरनाथ यात्रेला सुरुवात करणार आहे.यंदाची पवित्र श्री अमरनाथ यात्रा ३ जुलै ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. गोंदियाहून रवाना झालेल्या या विशेष यात्रेत हरेश भागवानी, विनोद (गुड्डू) चांदवानी, मोहित अनदानी, राहुल होतवानी, राहुल मोरयानी, संदीप वेडवानी, मोनू शिवदासानी, मयूर डोडाणी, रितिक वाधवानी, राहुल डोडाणी, सुशील सतानी, आकाश कुकरेजा, करण चंद्राकर, जयेश वाधवानी, अनमोल आहुजा यांच्यासह अनेक शिवभक्तांचा सहभाग आहे.
सलग १५ वर्षांची अखंड श्रद्धा
या यात्रेतील अनेक भाविक गेल्या १५ वर्षांपासून दरवर्षी नियमितपणे पवित्र श्री अमरनाथ यात्रा करून बाबा बर्फानींच्या चरणी नतमस्तक होत आहेत. कठीण डोंगररस्ते आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांची अखंड श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव इतर शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले गोंदिया रेल्वे स्थानक
भाविकांच्या प्रस्थानावेळी गोंदिया रेल्वे स्थानकावर नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व भाविकांचे पुष्पहार घालून व तिलक लावून स्वागत करण्यात आले तसेच त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर “हर हर महादेव”, “बम बम भोले” आणि “जय बाबा बर्फानी”च्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिमय झाले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी बाबा बर्फानींच्या चरणी प्रार्थना केली की, सर्व भाविकांची यात्रा सुरक्षित, यशस्वी आणि मंगलमय होवो तसेच सर्वांना सुखरूप दर्शन घेऊन आपल्या गोंदिया शहरात परतण्याचे आशीर्वाद लाभो.