कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कै. वसंतराव नाईक यांना अभिवादन; प्रगतिशील शेतकरी व पीक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
वाशिम, दि.3 जुलै: शेती आणि शेतकऱ्यांचा विकास हा केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून नसून प्रशासन व शेतकरी यांनी उत्कृष्ट समन्वय साधून एकत्रितपणे काम केल्यासच कृषी क्षेत्रात शाश्वत प्रगती साधता येईल. आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण शेती पद्धती आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
कृषी विभाग, जिल्हा परिषद वाशिम यांच्या वतीने १ जुलै रोजी कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान होते.
अध्यक्षीय समारोपात मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी कै. वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी विकासासाठी दिलेल्या दूरदृष्टीपूर्ण योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शासनाच्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने अधिक समन्वयाने कार्य करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके, शास्त्रज्ञ डॉ. राजेश डावरे आणि डॉ. भरत गीते यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, मृदा आरोग्य, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरीकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चौधरी, वैशाली गावंडे आणि गव्हाळे यांनी केले.
या कार्यक्रमात सन २०२५-२६ मधील जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारे राजू बल्लाळ, प्रल्हाद मोरे, नारायण देशपांडे, बबन गोदमोले, गणेश भोंडणे, सचिन राऊत, गोपाल गोदमोले आणि संतोष डाखोरे यांचा गौरव करण्यात आला.तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विहिरींची कामे पूर्ण करून शेतीत उल्लेखनीय प्रगती केलेल्या संदेश डेरे, दिलीप जयाजी सावंत, अनुसया गारुले, भीमराव कांबळे, संतोष अंभोरे, प्रयागबाई डाखोरे, रघुनाथ लठाड, संतोष मोरे, पांडुरंग भगत, अन्नपूर्णा ढाकरे आणि सीमा कोल्हारे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कर्मयोगी दादारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा येथील प्राचार्य वाकुडकर तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, उपसंचालक कृषी हिना शेख, उपसंचालक आत्मा निलेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी जावळे तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतिशील शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण मुंदडा, चिंतामणी, वैशाली गावंडे, राहुल राऊत, जयंत देव, जयंत खरात, किसन मते, मीनाज सय्यद आणि कैलास वाळले यांनी विशेष पुढाकार घेतला.





