अर्जुनी-मोर.दि.७ जुलै :“ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात नवेगाव बांध येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी २५ वारकरी सकाळी ८ वाजता पिकअप वाहनाने आळंदीकडे रवाना झाले. आळंदी येथून हे सर्व वारकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारी करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
प्रस्थानापूर्वी श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व वारकऱ्यांचा फुलहार, टिळा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या प्रसंगी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉ. अभिमन कापगते (नवेगावबांध), गंगाधर परशुरामकर (खोडशिवनी), शैलेश जायसवाल (नवेगावबांध), अण्णा पाटील डोंगरवार, चिंतामण तरोणे (सावरटोला), डॉ. प्रेम डोंगरवार (नवेगावबांध), सुनील तरोणे (नवेगावबांध),प्रेम अग्रवाल, चुनीलालजी तसेच भोजराम रहेले यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांचे पूजन करून त्यांना पुढील पायी वारीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली ही वारीची परंपरा यंदा पाचव्या वर्षीही अखंडपणे सुरू राहिल्याने परिसरातील वारकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी नवेगाव बांध परिसरातील अनेक ग्रामस्थ, विठ्ठलभक्त व वारकरी संप्रदायातील सदस्य उपस्थित होते. सर्वांनी “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला.
वारकऱ्यांमध्ये किशोर तरोणे, मनीषा तरोणे, विठोबा संग्रामे, उषा आदे, मंगला मेश्राम, किरण सूर्यवंशी, रचना वकेकर, छबुताई कठाणे, नंदकिशोर देवारे, सरिता तरोणे, पुष्पा तरोणे, रोहिणी वाढई, रामू गजबे, मुकेश खोटेले, नरेंद्र डोये, चैतन्य कोरे, संगीता खुणे, अर्चना चौधरी, जयवंत बावने, सरस्वता साठवणे ,नारायण सोनकुसरे, हिमेश राऊत, पुष्पा राधेश्याम तरोणे यांचा समावेश आहे.





