गोंदिया, दि.8 : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि डिजिटल क्रॉप सर्वे (Digital Crop Survey) ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतजमिनीची, पिकांची आणि कृषीविषयक माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविण्यात येत आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तलाठी, कृषी विभाग व महसूल विभागाच्या समन्वयातून प्रत्यक्ष शेतभेटी घेऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंद केली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा डिजिटल कृषी डेटाबेस तयार होणार असून विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे मिळण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना होणारे प्रमुख फायदे : पिकांची अचूक डिजिटल नोंद. पीकविमा, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई आणि विविध अनुदान योजनांचा लाभ अधिक जलद मिळण्यास मदत. शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होणे. शासनाकडे अचूक कृषी माहिती उपलब्ध झाल्याने नियोजन अधिक प्रभावी होणे. कृषी कर्ज, अनुदान व इतर सेवांमध्ये पारदर्शकता वाढणे.





