भंडारा, दि. 10 : आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) चे अभियान संचालक संजय काटकर (IAS) यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र भुयार येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविका, जन आरोग्य समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली.भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, रुग्णसेवा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, प्रभावी आणि सर्वसामान्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला.
आशा स्वयंसेविकांनी गावपातळीवरील कामकाजातील अडचणी मांडल्या. त्यावर आवश्यक समन्वय व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे काटकर यांनी सांगितले.आरोग्य विभागात डिजिटल प्रणालीचा अधिकाधिक वापर करून पेपरवर्क कमी करण्यासह कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल ॲप, ऑनलाइन अहवाल प्रणाली आणि डिजिटल डेटा नोंदणीसाठी सातत्याने प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जन आरोग्य समित्यांनी माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, आजार प्रतिबंध आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी डॉ. गोगुलवार, डॉ. मनिष नंदनवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जि.प. सदस्या संगीता नवघरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. डी. कैकाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य कानडे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.




