29.7 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home विदर्भ ३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ भंडाऱ्यातून प्रारंभ:जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी एकवटणार

३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ भंडाऱ्यातून प्रारंभ:जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी एकवटणार

0
11

नागपूर : ओबीसींची जातिनिहाय जनगणना, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी आणि इतर मागासवर्गीय तसेच भटक्या-विमुक्त समाजाच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी ‘सकल ओबीसी महामोर्चा’ने विदर्भभर ‘ओबीसी मंडल यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑगस्ट ‘मंडल दिना’चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही यात्रा ३ ऑगस्ट रोजी भंडारा येथून सुरू होणार असून ९ ऑगस्ट ‘क्रांतिदिनी’ चंद्रपूर येथे भव्य महाअधिवेशनाने तिचा समारोप होणार आहे.
महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंडल आयोगाच्या शिफारशींबाबत जनजागृती करणे,
ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी जनमत तयार करणे आणि समाजाला संघटित करणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. ३ ऑगस्टला भंडाऱ्यातून निघणारी यात्रा नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वागत समारंभ, जाहीर सभा, कोपरा सभा तसेच ओबीसी बांधवांशी थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी गोंदिया व ब्रम्हपुरी येथे ‘मंडल दिन’ विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्या दिवशी मंडल आयोगाच्या विचारांचा जागर आणि ओबीसी हक्कांसाठी मोठा एल्गार करण्यात येणार आहे.या यात्रेत राज्यातील विविध ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यात्रेचा समारोप ९ ऑगस्ट ‘क्रांतिदिनी’ चंद्रपूर येथे भव्य महाअधिवेशनाने होणार आहे.