जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते जिल्ह्यातील वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ
भंडारा, दि. 17 : पर्यावरण संवर्धन आणि हरित जिल्ह्याच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी मौजा संगम पुनर्वसन येथे 16 जुलै रोजी लोकसहभागातून भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जिल्ह्यातील वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सनफ्लॅग स्टील अँड आयर्न कंपनी, पतंजली योग परिवार, एस.डी.एस. आरोग्य धाम, विदर्भ गायत्री परिवार तसेच विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने 500 वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र आणि ग्रामस्थ यांचा सहभाग ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली.
कार्यक्रमाला सनफ्लॅग स्टील अँड आयर्न कंपनीचे व्यवस्थापक सतीश श्रीवास्तव, पतंजली योग परिवारचे जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोब्रागडे, एस.डी.एस. आरोग्य धामचे संस्थापक रामविलास सारडा, विदर्भ गायत्री परिवारचे सह-समन्वयक राजीव शक्करवार, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे, लागवड अधिकारी आर. टी. मेश्राम, उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे (रोहयो), जे. पी. लोंढे (भूसंपादन), लिना फलके (पुनर्वसन), गटविकास अधिकारी हुमने, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मंडळ अधिकारी महेश वैद्य व एम. टी. भुरे, तलाठी सुषमा इळपाते, सरपंच शारदा मेश्राम, ग्रामसेवक बोंदरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक वनीकरण विभागाने उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला. लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





