23.9 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home विदर्भ NAMASTE योजनेद्वारे कचरा वेचकांचे सक्षमीकरण;ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी – पुलकित सिह

NAMASTE योजनेद्वारे कचरा वेचकांचे सक्षमीकरण;ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी – पुलकित सिह

0
17

चंद्रपूर,दिनांकः17/07/2026 :स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील कचरा वेचकांच्या सन्मान, सुरक्षितता व सामाजिक सक्षमीकरणासाठी NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेची प्रभावी जनजागृती सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कचरा वेचकांची ओळख निश्चित करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कचरा वेचकांना अधिकृत ओळखपत्र, आयुष्मान भारत आरोग्य संरक्षण, वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE Kit), कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कचरा वेचकांचे जीवनमान उंचावण्यास आणि त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.योजनेसाठी पात्र असलेल्या कचरा वेचकांनी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील तसेच उपलब्ध असल्यास ई-श्रम कार्ड, सदस्यत्व कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्रांसह आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास कचरा वेचकांचे काम अधिक सुरक्षित, सुलभ व परिणामकारक होईल. तसेच पुनर्वापराला चालना मिळून पर्यावरण संरक्षणासही हातभार लागणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींनी NAMASTE योजनेची व्यापक प्रसिद्धी करून, गावातील सर्व पात्र कचरा वेचकांची शंभर टक्के नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.