विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक व प्रवाशांची गैरसोय
गोंदिया, १९ जुलै=अहेरी ते गोंदिया दरम्यान पूर्वी सुरू असलेली मुक्कामी एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, पालक, कामगार व व्यावसायिकांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे. ही बस सेवा बंद झाल्यापासून दोन्ही जिल्ह्यांतील शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
वर्षभरापूर्वी अहेरी आगारातून दुपारी २ वाजता सुटणारी ही बस गडचिरोली, आरमोरी, वडसा, लाखांदूर, साकोली, कोहमारा, सडक अर्जुनी व गोरेगाव मार्गे रात्री ८ वाजता गोंदियाला पोहोचत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता गोंदियाहून अहेरीकडे ही बस रवाना होत असल्याने या मार्गावरील विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती.
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही कोणतेही स्पष्ट कारण न देता ही बस सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भार आणि वेळेची नासाडी सहन करावी लागत आहे.विशेषतः शिक्षण, नोकरी, वैद्यकीय उपचार व व्यावसायिक कामांसाठी गोंदिया-गडचिरोलीदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अहेरी आगाराने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ही मुक्कामी बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी केली आहे.
बस सेवा पुन्हा सुरू झाल्यास गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांतील संपर्क अधिक सुलभ होईल, प्रवाशांची गैरसोय दूर होईल आणि राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
…





