गोंदिया, दि. 23 : नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा तात्काळ निपटारा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून गोंदिया जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत “महसूल जनकल्याण शिबिरे” आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सर्वश्री आमदार डॉ. परिणय फुके, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, ज्योती कांबळे, तहसीलदार समशेर पठाण, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, इंद्रायणी गोमासे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव येथील शिबिराची तारीख बदलून 2 ऑगस्ट करण्यात आली असून, 1 ऑगस्ट रोजी गोंदिया येथील जलाराम लॉन्स आणि 2 ऑगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी येथील आशीर्वाद हॉल येथे शिबिरे पार पडणार आहेत.
शिबिरांपूर्वी लाभार्थ्यांची पूर्व तपासणी, पात्रता पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. “एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये,” अशा सूचना आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिल्या.
तहसीलदार समशेर पठाण यांनी माहिती देताना सांगितले की, 22 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोंदिया येथे होणाऱ्या शिबिरात विविध विभागांमार्फत अनेक प्रकारचे लाभ एकाच ठिकाणी वितरित केले जाणार आहेत.
राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत आयोजित या शिबिरांमुळे महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये महसूल विषयक सेवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत योजना, वनपट्टे व जमीन पट्टे वाटप अशा महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ थेट गरजू नागरिकांना दिला जाणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मुक्त करून “सेवा तुमच्या दारी” या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे होय. प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या गरजेनुसार नियोजन करून, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभागांच्या समन्वयातून ही शिबिरे यशस्वीपणे पार पडणार आहेत.
0000000





