24.1 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home विदर्भ खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजना झाली अखेर ठप्प :ऐन पावसाळ्यात ३० गावांवर संकट

खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजना झाली अखेर ठप्प :ऐन पावसाळ्यात ३० गावांवर संकट

0
34

गोंदिया : : ‘हर घर जल’च्या भ्रामक अन् कागदी घोषणा देणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या बेफिकीर आणि नाकर्त्या कारभारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी व सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेर सप्टेंबरपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. पूर्वसूचना देऊनही जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ऐन पावसाळ्यात तब्बल ३० गावांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नळाला पाण्याचा थेंबही येत नसल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यातही गावकऱ्यांना पाण्यासाठी विहिरी आणि बोअरवेलचा आसरा घ्यावा लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या विहिरींचे अशुद्ध पाणी पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा या त्रासाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्यांच्या या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष व्याप्त आहे. मागील १९ वर्षापासून कोणतीही शासकीय अनुदानाची वाट न पाहता स्थानिक पाणीपुरवठा मंडळे व नागरिकांच्या वर्गणीतून या योजना सुरू होत्या. मात्र, वीज बिले आणि देखभालीच्या खर्चामुळे योजनांवर २० ते २५ लाखांची आर्थिक तूट निर्माण झाली. थकीत वीजबिलापोटी वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. ‘सुजल सामाजिक सेवा संस्थे’चे अध्यक्ष किशोर तरोणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रीतसर निवेदन देण्यात आले होते. परंतु, प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली. १९ वर्षे यशस्वीपणे चाललेल्या योजनांना पैशांअभावी मरणासन्न अवस्थेत सोडणाऱ्या प्रशासनाचा हा कोणता न्याय? लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का, असा उद्विग्न सवाल नागरिक विचारत आहेत.

तीव्र आंदोलनाचा इशारा
नळाचे पाणी बंद झाल्याने ३० गावांतील महिला व नागरिकांना विहिरींवर रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून थकीत वीजबिल भरावे आणि पाणीपुरवठा पूर्ववत करावा. अन्यथा, या ३० गावांतील संतप्त जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा थेट इशारा पाणीपुरवठा मंडळ व ग्रामस्थांनी दिला आहे.