31 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home शैक्षणिक हिंदीच्या शाळांना दर्शविले मराठी माध्यम शिक्षण विभागाची चुकः टीईटी पात्र उमेदवारांवर अन्याय

हिंदीच्या शाळांना दर्शविले मराठी माध्यम शिक्षण विभागाची चुकः टीईटी पात्र उमेदवारांवर अन्याय

0
43

गोंदिया -राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टीईटी पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर नियक्ती केली जात आहे. मात्र गोदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागाकडून पवित्र पोर्टलवर हिंदी माध्यमांच्या शाळांना मराठी माध्यम म्हणून दर्शविण्यात आले आहे. परिणामी हिंदी माध्यमांच्या शाळांवर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मराठी माध्यमांच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामुळे हिंदी माध्यमांच्या टीईटी पात्रता धारक उमेदवारांवर अन्याय झालা आहे. असा आरोप पिडीतांनी केला आहे. यासंदर्भात मंत्रालयास्तरापर्यंत पाठपुरावा सुरु आहे. यापुढे न्यायालयात धाव घेण्याची तयारी पिडीतांनी दर्शविली आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात जम्बो शिक्षक भरती सुरू आहे. पवित्र पोर्टलमध्ये सर्व जिल्हा परिषद संस्थांकडून जिल्ह्यातील शाळांचा रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली. या पोर्टलवर इतभुत प्रमाणित माहिती अपलोड करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची होती. मात्रगोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने आपल्या भोंगळ कारभाराचा परिचय देत सर्व नियम डावलून हिंदी माध्यमांच्या शाळांना मराठी माध्यमांमध्ये दर्शविले आहे. यामुळे जवळपास हिंदी माध्यमाच्या ९५ जागा कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे टीईटी पात्रता धारक उमेदवारांची राज्य शासनाकडून शिक्षक पदावर निवड करण्यात आली आहे.
उपलब्ध जागानिहाय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून निवड यादीही जाहिर करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात हिंदी माध्यमांच्या शाळा मराठी दर्शविण्यात आल्याने त्या जागांवर मराठी व बंगाली या माध्यमांच्या उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. यामुळे हिंदी माध्यमांच्या पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. असा आरोप आज (ता. १६) पत्र परिषदेच्या माध्यमातून पिडितांनी केला आहे या संदर्भात जि.प. चे मुकाअ, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यानच्या काळात शिक्षण आयुक्ताने गोंदिया जिल्ह्याला भेट दिली तेव्हा ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र गोंदियाचा शिक्षण विभाग गेल्या आठ दिवसांपासून झालेली चुक शासनाच्या निदर्शनास आणून देण्यास टाळाटाळ करीत आहे. दिवसकाढू धोरण अवलबून पवित्र पोर्टलच्या उमेदवारांना कार्यशाळेच्या माध्यमातून पदस्थापना करीत आहे. एंकदरीत गोंदिया जिल्हा परिषदेच्या चुकीमुळे अन्याय झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. आगामी काळात गोंदिया जिल्हा परिषद तसेच शिक्षण विभागाविरूध्द न्यायालयात दाद मागू किंबहूना मोठे आंदोलन करू, असा इशारा
ललितकुमार मच्छिरके, गायत्री दीपक नागपुरे, राजेश्वरी मानदास बसेना, प्रदीप नागपुरे, ज्योती रायसिंह मच्छिरके, सागर लिल्हारे, देवचंद लिल्हारे, राधेश्याम गिरिया, रीता लिल्हारे, सुनील वाहने, सरोज कुंभलवार, संजयकुमार सुलाखे, प्रवीण दमाहे, प्रदीप लिल्हारे, शिवकुमार बिसेन, अंकित सूर्यवंशी, रेखा पटले, छाया पटले, सत्यशिला कटरे, माधुरी पटले, डीलेश्वरी बोपचे, साची टेंभरे या पिडीतांनी दिला आहे.

पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या टीईटी २०२५ प्रक्रियेत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांना रिक्त पदांचा प्राधान्यक्रम उपलब्ध न झाल्याच्या तक्रारीची गोंदिया जिल्हा परिषदेने दखल घेतली आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या आयुक्तांना पत्र पाठवून योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले आहे, अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर गोंदिया जिल्हा परिषद येथील रिक्त पदांसाठी इयत्ता ६ ते ८ व इयत्ता ९ ते १० या अध्यापनाचे माध्यम हिंदी उपलब्ध झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी तक्रारी केल्या आहेत.

आम्ही तुमच्यासाठी बसले आहोत का?
गोदिया जिल्ह्यातील गोदिया व सालेकसा या दोन तालुक्यात सर्वाधिक हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत. मात्र जिल्हा परिषदेने पवित्र पोर्टलमध्ये चुकीची नोंदणी करीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय केला आहे, ही बाब जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी निडित गेले असता त्यांचे म्हणणे ऐकण्याऐवजी सभापती यांनी चक्क हाकलून लावले. आम्ही तुमच्या साठीच बसले आहोत का? असा प्रतिप्रश्नही पिडीतांसमोर उपस्थित केला. अशी आपबिती पिडीतांनी आयोजित पत्र परिषदेत व्यक्त केले. या प्रकारामुळे शिक्षण सभापतीचे नेमके काम कोणते? यावरही आता चर्चा रंगली आहे.