मसेलीच्या व्यापाऱ्याकडून ९५ लाख ६५ हजारांची रोकड जप्त

0
7

कोरची, ता.१७: येथून १० किलोमीटर अंतरावरील मसेली येथील एका व्यापाऱ्याकडून पोलिसांनी तब्बल ९५ लाख ६५ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम नेमकी कुणाची आहे, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
मसेली येथील प्रतापसिंह गजभिये यांच्या घरी मोठी रक्कम असून ती बदलण्यासाठी श्री.गजभिये गोंदियाला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी काल मसेली-देवरी रस्त्यावर नाकाबंदी केली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता प्रतापसिंह गजभिये व त्यांचे पुत्र हेमंत गजभिये यांच्या वाहनात ३३ लाख रुपयांच्या जुन्या व ६२ लाख ६५ हजार ५०० च्या नवीन नोटा अशी एकूण ९५ लाख ६५ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी प्रतापसिंह गजभिये यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी श्री.गजभिये यांनी या नोटा आमच्या व्यवसायातील असून, गोंदियातील व्यापाऱ्यांकडे बदलण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांनीही नोटा आपल्याच असल्याचे सांगितले. चौकशीनंतर सर्वांना सोडून देण्यात आले. नोटांसंबंधी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या चौकशीनंतरच चौघांना पुन्हा ताब्यात घेण्यात येईल. मात्र, पोलिसांनी मिळालेली रोकड सील केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अतुल तवाडे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
८ नोव्हेंबरपूर्वी बँकेच्या आपल्या खात्यातून ७० लाख रुपये काढल्याचे समजते. परंतु ८ नोव्हेंबरला अचानक नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर काढलेल्या रकमेतील काही रक्कम कुचकामी ठरली. बँकेतूनही केवळ दोन ते चार हजार रुपयेच मिळायचे. त्यामुळे गजभिये यांच्या व्यवसायावर दुष्परिणाम होऊ लागला. अशातच गजभिये यांचे गोंदियातील करंसी बदलणाऱ्या टोळीशी सूत जुळले. त्यांच्या माध्यमातून गजभिये यांनी बँकेतून काढलेल्या रकमेला दोन व पाच टक्के दराने बदलून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना ३५ लाख रुपयांचा नवीन नोटा मिळाल्या. उर्वरित जुनी रक्कम घेऊन ते १६ डिसेंबरला पुन्हा गोंदियाला जाण्याच्या प्रयत्नात होते. याविषयीचा सुगावा लागताच पोलिसांनी सापळा रचून गजभिये यांच्याकडून जुन्या एक हजार व पाचशेच्या नोटा ताब्यात घेतल्या.