कुख्यात व्याघ्रशिकारी कुट्टूला अखेर भंडा-यात आणले

0
9

भंडारा, दि. 18 – कुख्यात व्याघ्रशिकारी कुट्टू पारधीला ३० नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील लखीमपूर (खिरी) येथे अटक केल्यानंतर शनिवारी भंडाºयात आणण्यात आले. उत्तरप्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो व सायबर सेलच्या पथकाने त्याला अटक केली होती. त्याला दुपारी लाखांदूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बहेलिया समाजाचा वाघाचा शिकारी कुख्यात राहूल ऊर्फ कुट्टु गुलाबसिंग गोंड ठाकूर ऊर्फ पारधी हा भंडारा जिल्हा कारागृहात वन अधिनियमांतर्गत अटकेत होता. बंदी असताना त्याला २१ जानेवारी २०१६ रोजी भंडारा कारागृहातून वडसा न्यायालयात हजर करण्याकरीता बसने नेण्यात आले होते. तेथून परतताना लघुशंकेचा बहाणा करुन पोलिसाला जोराचा धक्का देऊन हातकडी व दोरखंडासह पळून गेला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर (खिरी) येथे तो वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी मिळाली. साहू यांनी लखीमपूरचे पोलीस अधीक्षक आणि लखनऊ स्पेशल टास्क फोर्सशी संपर्क साधून त्यांना कुट्टूची इत्थंभूत माहिती दिली होती. लखनऊ स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक मनोज झा यांनी शोध मोहीम राबवून त्याला चंदन तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली.
लखीमपूर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने आजारपणाचे ढोंग करणे सुरू केले.उपचाराकरीता रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याकरीता अतिदक्षता विभागात भरती केले होते. त्यामुळे कट्टूला भंडारा पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी विलंब झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक रिजवी यांच्या नेतृत्वात पोलिसांची चमू ३० नोव्हेंबरपासून १७ दिवस लखीमपूर येथे तळ ठोकून होते. शनिवारी सकाळी कुट्टूला भंडारा येथे आणण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, निरीक्षक रिजवी, पोलीस कर्मचारी रोशन गजभिये, वैभव चामट, कौशिक गजभिये, चेतन पोटे, अनुप वालदे अनिल थोटे, किरण नागदेवे, काटे यांनी केली.